ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र; राऊत यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेसचा गंभीर आरोप

Mumbai – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील निवासस्थानी रविवारी सकाळी सात वाजता ईडीचे पथक पोहोचले आहे. घरातच संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याचे समजते. या दरम्यानच संजय राऊत यांनी ट्विट करत …तरिही शिवसेना सोडणार नाही, असे ठाम मत व्यक्त केलं आहे. सोबतच महाराष्ट्र व शिवसेना लढत राहिल असंही ते म्हणाले.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालं आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या टीकेमुळे दुखावले गेलेले भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) नेते आता त्यांच्यावर तुटून पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील काही नेते भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या राऊत यांचा बचाव करताना दिसून येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीनं संजय राऊतांच्या सोबत असल्याचं सांगत ही कारवाई सूडबुद्धीनं केली जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच राऊतांना पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sanjay Sawant) यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांच्या घरावर पोहोचलेली ED लोकशाहीच्या विदारक अवस्थेचे चित्र दर्शवत आहे. भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे. ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र आहे. भाजपात गेल्यावर या अस्त्रापासून संरक्षण मिळते. आम्ही संजय राऊत यांच्या पाठीशी उभे आहोत. जनतेचा लढा आहे, लढत राहू, असं ते म्हणाले.