उर्फीला बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण गजाआड, बिहारमधून केली अटक

Mumbai: सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदला (Urfi Javed) वारंवार जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात उर्फी जावेदने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी बिहारमधील पाटणा येथून नवीन गिरी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. उर्फीने सांगितले होते की, आरोपी व्हॉट्सअॅप कॉलवर सतत अश्लील भाषेचा वापर करून धमकी देत ​​आहे. उर्फीने सांगितले की, आरोपी तरुण तिच्या फॅशन स्टाइलवरही आक्षेप घेत होता.

या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक तपास केल्यानंतर पटना शहरातील नवीन गिरी हा तरुण उर्फीला धमकावत असल्याचे आढळून आले. यानंतर मुंबई पोलिसांनी पाटणा गाठून त्याला अटक केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पाटणा कोतवाली पोलिसांच्या मदतीने आरोपी नवीन गिरी याला हॉटेलमधून अटक करून मुंबईत आणण्यात आले. त्याची चौकशी सुरू आहे.

दुसरीकडे उर्फीने इंस्टाग्रामवर सांगितले होते की, आरोपी नवीन हा तीन वर्षांपूर्वी परिचयात होता आणि त्याच्याकडे तिचा फोन नंबरही होता. आता अचानक त्याने त्या नंबरवर मेसेज पाठवून धमक्या देण्यास सुरुवात केली. नवीन हा त्या नंबरवर कॉल करून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही देत ​​होता. उर्फीने तिच्या तक्रारीसोबत कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले होते.