ओबीसी म्हणून पंकजांना पाडलं, जानकरांना हरवलं, प्रीतमना मंत्रीपद नाकारलं – यशोमती ठाकूर

मुंबई – आपल्या देशात काहीतरी चुकतंय. ओबीसी समाजाला सतत डावलण्याचं काम केंद्रात सत्तेत बसलेले लोक करीत आहे. ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन, नको त्या गोष्टी करून घेण्याची केंद्रात सत्तेत बसलेल्यांना सवय लागली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या समाजाची बहीण पंकजा मुंडे यांनाही या लोकांनी पाडलं, त्यांची बहिण प्रीतम मुंडे यांना ओबीसी म्हणून केंद्रात मंत्री पद नाकरलं, आज महादेव जानकरांची ही तीच अवस्था केलीय. अशा प्रकारे केंद्रसरकारकडून ओबीसींना डावलण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केला. त्या शेगांव, बुलढाणामधील ओबीसी समाज अधिकार संमेलनात बोलत होत्या.

ओबीसींचे आरक्षण आणि त्यांच्या ज्वलंत मागण्या आणि प्रश्नांसंदर्भात ओबीसी महासंघाच्या वतीने संतनगरी शेगांवात आज ओबीसी समाज अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आशिष दुवा, ज्ञानेश्वर पाटील, राहुल बोन्द्रे, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, ओबीसी समितीचे बबन तायवाड़े, जयश्री शेळके, श्यामबाबू उमाळकर, दत्ताभाउ खरात, कासम गवली आदी मान्यवर उपस्थित होते.

केवळ आरडाओरडा करणारा विरोधी पक्ष नेता  
विरोधी पक्ष नेत्याचा असा काही आरडाओरडा असतो की, आवाज फक्त त्यांच्याकडेच आहे. असा आरोप राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केला. ते असेही म्हणाल्या की, पण जेव्हा आम्ही ओरडू तेव्हा मात्र तुम्हाला आवाज काय असतो हे कळेल. वेळ आल्यावर आम्ही ते ही करू.

पंकजा मुंडे चुकीच्या पक्षात 
आज ओबीसी समाज अधिकार संमेलनात उपस्थितांशी संवाद साधताना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आपल्या समाजाची बहीण पंकजा मुंडे यांनाही या लोकांनी पाडलं. आज त्या चुकीच्या पक्षात आहेत.

ओबीसी युवकांचा वापर 
पुण्यात हत्यारांसह एक तरुण सापडला होता. चौकशीत मात्र तो ओबीसी समाजाचा असल्याचे समजले. मात्र केंद्रात सत्तेत बसलेल्यांसाठी काम करीत होता. अशाप्रकारे आपल्या मुलांचा, तरुणांचा वापर ही मंडळी करीत आहेत.