शुबमनच्या बॅटने मुंबईच्या गोलंदाजांना फोडून काढलं, प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा पाचवाच भारतीय

अहमदाबाद-  मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात (Mumbai Indians vs Gujrat Titans) झालेला आयपीएल २०२३ चा दुसरा क्वालिफायर सामना (Qualifier 2) हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) संघाने गाजवला. प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या १२९ धावांच्या (६० चेंडू) धुव्वादार शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटकात ३ बाद २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला १८.२ षटकात १७१ धावाच करता आल्या. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची कोंडी झाली आणि त्यांनी ६२ धावांच्या फरकाने सामना गमावला. या पराभवासह मुंबई स्पर्धेतून बाहेर झाली असून गुजरातने सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या सामन्यात शतकी खेळी करत शुबमन गिल (Shubman Gill) खास क्लबमध्ये सामील झाला आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा तो सातवा आणि केवळ पाचवा भारतीय ठरला आहे.

आयपीएल प्लेऑफमध्ये शतक ठोकणारे भारतीय धुरंधर (Century In IPL Playoffs)

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आतापर्यंत ७ फलंदाजांनी शतक ठोकले असून त्यापैकी पाच जण भारतीय आहेत

१. मुरली विजय (सीएसके)
११३ धावा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध
आयपीएल २०१२, क्वालिफायर २

२. विरेंद्र सेहवाग (पंजाब किंग्ज)
१२२ धावा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध
आयपीएल २०१४, क्वालिफायर २

३. वृद्धिमान साहा (पंजाब किंग्ज)
११५ धावा केकेआरविरुद्ध
आयपीएल २०१४, अंतिम सामना

४. रजत पाटीदार (आरसीबी)
११२ धावा लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध
आयपीएल २०२२ एलिमिनेटर

५. शुबमन गिल (गुजरात टायटन्स)
१२९ धावा मुंबई इंडियन्सविरुद्ध
आयपीएल २०२३, क्वालिफायर २