अखेर यंदाच्या हंगामात अर्जुन तेंडूलकर करणार आयपीएल पदार्पण? कर्णधार रोहितकडून संकेत

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या आधी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कॅम्पमधून मोठी माहिती समोर आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) लीगमध्ये पदार्पण करू शकतो. हंगाम सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर (Coach Mark Boucher) यांनी डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले आहे की व्यवस्थापनाच्या नजरा अर्जुनवर आहेत (Arjun Tendulkar IPL Debut) आणि त्याला यावर्षी प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

अर्जुन गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, परंतु दोन्ही हंगामात तो बेंचवर बसून होता. गेल्या रणजी मोसमात त्याने गोव्यासाठी पदार्पणातच शतक झळकावले होते. याशिवाय गोलंदाजीतही तो खूप प्रभावी ठरला होता. तो सध्या गोलंदाजी करत नसल्याचेही पत्रकार परिषदेदरम्यान उघड झाले. तो दुखापतग्रस्त असून बुधवारपासून गोलंदाजी सुरू करणार आहे.

पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “अर्जुन तेंडुलकरने अलीकडच्या काळात चांगले क्रिकेट खेळले आहे. त्याला दुखापत झाली होती, मात्र आज तो गोलंदाजीला सुरुवात करणार आहे.” तर मार्क बाउचर म्हणाले, “अर्जुन गेल्या काही काळापासून चांगले क्रिकेट खेळत आहे. तो चांगली गोलंदाजी करत आहे. आम्हाला वाटते की तो या वर्षी प्लेइंग 11 मध्ये असेल.”