जातनिहाय जनगणना करण्यासाठी सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन आवाज उठवावा – छगन भुजबळ

नाशिक :- आरक्षण हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यासाठी देशात आणि राज्यातही जात निहाय जनगणना करण्याची आपली मागणी आहे. यासाठी ओबीसीतील सर्व घटकांनी एकत्र येऊन ही मागणी कायम ठेवावी. ओबीसी समाजातील सर्व घटक एकत्र राहिले तर आपण आपले सर्व हक्क मिळवू शकतो. त्यामुळे ओबिसिंच संघटन तितकच महत्वाचे आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

शेवंता लॉन्स नाशिक येथे लोणारी समाज सेवा संघ राज्यस्तरीय परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे, शोभाताई मगर, भोलानाथ लोणारी, राजेंद्र लोणारी, रवींद्र धंगेकर, हरिभाऊ कुऱ्हे, संजय कुऱ्हे, वसंतराव घुले, दिपक लोणारी, डॉ.प्रवीण बुल्हे, देभास्करराव जहाड यांच्यासह लोणारी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना आपले हक्क मिळवण्यासाठी देशात जातनिहाय जनगणना होण्याची आवश्यकता आहे. बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना सुरू केली आहे. आपल्या राज्यात आणि देशातही ही जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी आपले पहिल्यापासून प्रयत्न आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, लोणारी समाज हा कोळसा,चुना, मीठ अशा गोष्टींशी निगडित असणारा व अशा गोष्टी तयार करून आपली रोजी रोटी चालवणारा समाज म्हणजे लोणारी. या समाजाला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. या समाजाचा उल्लेख अगदी महाभारतात आढळतो.कि जे १५०० – २००० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलं आहे. लोणारी समाज हा बहुजन समाजाचाच एक घटक आहे. या समाजाचे महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात इतर बहुजन समाजाप्रमाणे हा देखील समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला होता. परंतु महात्मा फुले, छत्रपती शाहू, महाराज अशा सारख्या लोकांनी जो शिक्षणाचा मार्ग सर्व बहुजन समाजाला दाखवला. महिलांना शिक्षण देण्यासाठी अनेकांचे बलिदान आहे. त्यामुळे तसेच लोणारी समाजाला ओबीसी मध्ये सामावून घेण्यासाठी कैलासवासी दादरे साहेबांनी दिलेल्या योगदानामुळे हा समाज आता प्रगतीच्या मार्गावर चालत आहे. लोणारी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून त्या सोडविण्यासाठी तसेच समाजाला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी विष्णूपंत दादरे दादा यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे.दादरे दादांच्या कामाचा आदर्श समाजातील सर्व युवक युवतींनी घेऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणाशिवाय आपल्या समोर कुठलाही पर्याय नाही. शिक्षण घेऊनच आपण आपले हक्क मिळवू शकतो. समाजातील तरुण तरुणींनी उच्च शिक्षण मिळवावं विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवावे असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, लोणारी समाजातही अनेक उपजाती बघायला मिळतात. सर्वांनी एक छत्राखाली येऊन काम करावे. कुठलीही पोटजात न मानता एकत्र व्हावे. या सर्व जातीतील बांधवांनी एकत्र येऊन रोटी बेटी व्यवहार करावा. आपला समाज एकसंघ ठेवावा. लोणारी समाज हा ओबीसी प्रवर्गातील एक महत्वाचा घटक आहे. ओबीसी समाजाचे न्याय हक्क मिळवण्यासाठी सर्व ओबीसी समाजाची एकजूट तेवढीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.