‘उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर; इंदापूरला पाणी देणार नाही’

सोलापूर –जिल्ह्यातील अनेक योजना अपूर्ण असताना, पाण्यावाचून शेतकरी (Farmers) होरपळत आहे. सोलापूर जिल्ह्याची (Solapur district) वरदायिनी असलेल्या उजनी (Ujani) जलाशयातून इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडी-निंबोणी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा कुटील डाव रचला आहे. उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.

सोलापूरकरांचा विरोध डावलून उजनी धरणातील पाणी बारामती (Baramati), इंदापूरला देण्यावरून वातावरण पेटताना दिसत आहे. काल पंढरपुरात (Pandharpur) उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या (Water Rescue Struggle Committee) वतीने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन, सीना-माढा उपसा सिंचन, एकरुख उपसा सिंचन, मंगळवेढा उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन, सीना भीमा उपसा सिंचन, दहिगाव उपसा सिंचन या उजनी जलाशयावर अवलंबुन योजना आजही अपूर्ण असताना, इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन साठी पवार ठाकरे सरकार (Pawar – Thackeray Gov) कोट्यवधी रुपये देतात, हा खुनशी डाव आहे.असा आरोप देखील समितीने केला आहे.

उजनी जलाशय हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे असून योजनेचे नाव बदलून अथवा जुनी योजना आहे असे सांगून सोलापूरकरांच्या डोक्यात दगड घालण्याचे महापाप बारामती आणि इंदापूरकर करत असून उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.