IPL Auction 2023 : हेल्स-फिंचपासून ते स्मिथ-स्टार्कपर्यंत, हे स्टार खेळाडू लिलावात सहभागी होणार नाहीत

IPL Auction 2023:  IPL 2023 लिलावासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोची येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यावेळी मिनी लिलावात अनेक बडे खेळाडू सहभागी नाहीत. या क्रिकेटपटूंमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. मात्र यातील काही खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी करणेही योग्य मानले नाही. तर काहींनी जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीग आयपीएलमधून आपली नावे मागे घेतली.

आयपीएल लिलावासाठी निवडलेल्या ४०५ खेळाडूंची यादी पाहिली तर अनेक क्रिकेटपटूंची नावे दिसत नाहीत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेला ख्रिस गेल या लिलावाचा भाग नाही. गेल्या मोसमातही गेलने आयपीएल लिलावात आपले नाव दिले नव्हते. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचही यावेळी लिलावाचा भाग असणार नाही. फिंच गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता.(IPL Auction 2023: From Hales-Finch to Smith-Starc, these star players will not participate in the auction).

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी लिलावासाठी नोंदणी केलेली नाही. त्याला आयपीएलमध्ये 10 वर्षे खेळण्याचा अनुभव आहे. स्मिथ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या 2485 धावा आहेत. त्यांच्याशिवाय,  अॅलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्ज, मार्नस लॅबुशेन, ख्रिस वोक्स, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स (Alex Hales, Sam Billings, Marnus Labuschagne, Chris Woakes, Mitchell Starc and Pat Cummins) यांचाही आयपीएल 2023 च्या लिलावात समावेश नाही.