मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा फायनल गाठत विक्रमांचा रचला ढीग

अहमदाबाद-  मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात (Mumbai Indians vs Gujrat Titans) झालेला आयपीएल २०२३ चा दुसरा क्वालिफायर सामना (Qualifier 2) हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) संघाने गाजवला. प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या १२९ धावांच्या (६० चेंडू) धुव्वादार शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटकात ३ बाद २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला १८.२ षटकात १७१ धावाच करता आल्या. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची कोंडी झाली आणि त्यांनी ६२ धावांच्या फरकाने सामना गमावला. या पराभवासह मुंबई स्पर्धेतून बाहेर झाली असून गुजरातने सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या आयपीएलमध्ये गुजरातने मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, २०२२मध्ये गुजरात संघाने आयपीएलमध्ये प्रवेश केला होता आणि पहिल्या २ वर्षांतच गुजरातचा संघ दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाने हा पराक्रम केला नाही.

आयपीएल २०२३ मध्ये बनला मोठा विक्रम
विशेष म्हणजे या मोसमातील पहिला सामनाही गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज  (Gujrat Titans vs Chennai Super Kings) यांच्यात झाला होता. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की तेच दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने असणार आहेत, ज्यांनी हंगामातील पहिला सामना खेळला आहे.

सलग दुसऱ्या हंगामात आयपीएल ट्रॉफीसाठी लढणारा मुंबई आणि चेन्नईनंतरचा तिसरा संघ बनण्याची गुजरातकडे सुवर्णसंधी आहे. यापूर्वी चेन्नईने २०१० आणि २०११ मध्ये सलग ट्रॉफी जिंकली होती. तर मुंबईने २०१९ आणि २०२० मध्ये हा पराक्रम केला.