Vasant More | नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का? वसंत मोरे यांचा सवाल

Vasant More |  कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आला असून त्याच्या पित्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एकीकडे या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दुसरीकडे मात्र राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. कल्याणी नगर अपघात प्रकरणावरून भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असताना पाहायला मिळत आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी यात उडी घेतली असून नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

सोशल मीडिया पोस्टद्वारे वसंत मोरे म्हणाले, कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येत आहे.

शहरात नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे,सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना लगावला.

तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे,
नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ? असा सवाल करत त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्या वरती देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला.

कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल चा इशारा देखील वसंत मोरे यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप