युवा सेना संघटना पक्ष बांधणी व मार्गदर्शन करण्यासाठी किरण साळी सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट अतिशय आक्रमकपणे राजकीय वाटचाल करताना दिसून येत आहे. रोज नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत तसेच अनेक ठिकाणी शिंदे गट मेळावे घेत असून याद्वारे पक्षात नवीन चैतन्य निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट आणि भाजपने महाराष्ट्रात मिशन ४५ सुरु केले  असून दोन्ही पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करू लागले आहेत.

दरम्यान, याचाच एक भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या आदेशाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत, आमदार शहाजी पाटील, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना संघटना पक्ष बांधणी व मार्गदर्शन करण्यासाठी युवा सेनेचे राज्याचे सचिव किरण साळी (Yuva Sena State Secretary Kiran Sali) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सोलापूर विश्रामगृह सात रस्ता येथे बैठकीचे आयोजन केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाची असणारी भूमिका आणि आगामी निवडणुकांसाठी कशी तयारी करावी याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन यावेळी केले जाणार आहे.

या दौऱ्यात ते सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. एका बाजूला शिंदेची शिवसेना तर दुसऱ्या बाजूला युवसेना देखील सक्रीय झाल्याने पक्षात नवीन चैतन्य संचारले आहे. इतर पक्षातील पदाधिकारी सुद्धा यामुळे शिंदे गटाकडे आकर्षित होऊ लागले असून यातूनच आगामी काळात काही पक्षप्रवेश देखील होतील अशी शक्यता आहे.