पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का?

पुणे – माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुरंदर विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारने जुना प्रस्ताव बास्नात गुंडाळून नवीन प्रस्ताव पाठवला. त्यातील तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाने नाकारला. त्यामुळे जुन्या जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का? असा सवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, पुरंदर विमानतळासाठी कोणाच्याही हितसंबंध न जोपासता सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी दर शुक्रवारी यासंदर्भात शासकीय पाठपुरावा घेण्यासाठी बैठक घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

पुरंदर विमानतळासंदर्भात क्लब ऑफ इन्फ्यूएन्सरच्या वतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रानंतर  पाटील माध्यमांशी बोलत होते. या बैठकीला खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, खा. सुप्रिया सुळे, उद्योजक सुधीर मेहता, प्रशांत गिरबाने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, लोकमतचे संपादक विजय बावीसकर, एअर मार्शल भूषण गोखले, सकाळच्या कार्यकारी संपादिका शितल पवार आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावास मान्यता देऊन, त्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळवल्या होत्या. पण यानंतर यास विरोध असल्याचे भासवून, महाविकास आघाडी सरकारने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला, आणि तांत्रिक त्रुटींसह नवीन प्रस्ताव पुढे पाठवला. परिणामी नवीन प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाने नाकारला. या नवीन प्रस्तावात कुणाचे हितसंबंध जपले गेले होते, ते सर्वांनाच माहित आहे.

ते पुढे म्हणाले की, आता नवीन प्रस्ताव जरी नागरी उड्डाण मंत्रालयाने नाकारला असला, तरी जुना प्रस्तावाची मान्यता अद्याप रद्द झालेली नाही. त्यामुळे जुन्या जागेचा प्रस्ताव मंजूर असल्याचा ठराव राज्य सरकारने करुन, तो पुनर्विचारासाठी केंद्राकडे पाठणार आहात का? असा सवाल  पाटील यांनी उपस्थित केला.

पुण्यातील विमानतळाबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, नवीन विमानतळ उभारण्यास किमान दहा वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जुन्या विमानतळाच्या सुविधा वाढविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका, पीएमआरडीए यांच्यासह सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पुरंदर विमानतळासाठी क्लब ऑफ इन्फ्लूएन्सरने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करुन पाटील म्हणाले की, पुरंदर विमानतळ ही काळाची गरज आहे. त्यामुळे यासाठी पुढाकार घेणाऱ्या क्लब ऑफ इन्फ्लूएन्सरचे कौतुक केले पाहिजे. पण त्याचबरोबर शासकीय स्तरावर दर आठवड्याच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत या विषयाचा अंतर्भाव करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच पुरंदर विमानतळासाठी भारतीय जनता पक्षाकडून आ. सिद्धार्थ शिरोळे हे याचा पाठपुरावा करतील, जेव्हा कधीही गरज असेल, तेव्हा मीदेखील स्वतः दिल्लीत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करेन अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.