शेतकरी आंदोलन संपवण्याची अखेर अधिकृत घोषणा, ‘या’ तारखेपासून सीमा खुली होणार

नवी दिल्ली-  दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चा (SKM) मोर्चाने ही घोषणा केली. बैठकीनंतर किसान मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन 11 डिसेंबरपासून सर्व धरणे स्थळे रिकामी करणार असल्याचे सांगितले.

दिल्लीत किसान मोर्चाच्या बैठकीनंतर शेतकरी नेते गुरनाम सिंह चदुनी म्हणाले, ‘आम्ही आमचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जानेवारीला आम्ही आढावा बैठक घेणार आहोत. सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यास पुन्हा आंदोलन सुरू करू.दर्शन पाल सिंह यांनी सांगितले की, आंदोलक शेतकरी 11 डिसेंबरला आंदोलनस्थळ रिकामे करतील. म्हणजेच 11 डिसेंबर रोजी दिल्ली, सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरच्या तीन सीमेवरून शेतकरी आपापल्या घरी परततील.

दरम्यान, दिल्ली-हरियाणातील सिंघूमध्येही शेतकऱ्यांनी त्यांच्या धरणे स्थळावरून तंबू हटवण्यास सुरुवात केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, एका शेतकऱ्याने सांगितले की, ‘आम्ही आमच्या घराकडे निघण्याच्या तयारीत आहोत, मात्र अंतिम निर्णय संयुक्त किसान मोर्चा घेईल.

‘दुसरीकडे, आंदोलक  शेतकऱ्यांना भारत सरकारचे पत्र मिळाले आहे, ज्यात एमएसपीवर समिती स्थापन करण्याचे आणि त्यांच्यावरील खटले त्वरित मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यात लिहिले आहे, ‘जोपर्यंत भरपाईचा प्रश्न आहे, यूपी आणि हरियाणाने तत्वतः संमती दिली आहे.’