लसीकरणाचा १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन

नवी दिल्ली-  देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ९० टक्के जनतेला लशीची पहिली मात्रा मिळाली, असून ६५ टक्के पात्र नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी २१ ऑक्टोबरला देशानं १०० कोटी मात्रांचा टप्पा गाठला होता. कोविड प्रतिबंधक लसीकरणात १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे.

देशातले वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी, लस निर्माते यांना पंतप्रधानांनी या यशाचं श्रेय दिलं आहे. भारताचा हा नवा संकल्प देशाचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता दाखवतो, असं ते म्हणाले. ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूमुळं रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाचं हे कवच महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत देशातल्या ९० टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांना लशीची किमान एक मात्रा मिळाली आहे.

यावर्षी देशानं १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. अवघ्या ५ दिवसात दीड कोटींहून अधिक मुलांना लस दिली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कठोर मेहनतीमुळं देशानं हे यश संपादित केल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.