आता ऊस पिकावर ड्रोनद्वारे होणार औषध फवारणी

कागल – येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शनिवारी(ता.१५)कागल येथे ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. अशी घोषणा कारखान्याच्या नूतन अध्यक्षा सुहासिनीदेवी  घाटगे यांनी घोषणा केली . यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,नूतन व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे ,कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील सर्व संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या,कारखाना चालवीत असताना आज स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी  माजी चेअरमन  राजे समर्जीतसिंह घाटगे यांनी व्यवस्थापन व प्रशासनाचे माध्यमातून कारखान्यात नेहमीच नव -नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.  ड्रोन द्वारे औषध फवारणी या आधुनिक तंत्रज्ञानाने उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठीचा हा  एक वेगळा प्रयोग आहे.

शाहू ,कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबविण्यात येत आहेत. ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र मोठ्या ऊस पिकात या फवारणी घेताना अडथळे येतात .तसेच मनुष्यबळाअभावी इच्छा असूनही शेतकऱ्यांना या फवारण्या वेळेत घेता येत नाहीत. यावर पर्याय म्हणून अत्याधुनिक तंत्राद्वारे तयार केलेले ड्रोन द्वारे फवारणीचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना याची माहिती व फायदा व्हावा. यासाठी त्याचे प्रात्यक्षिक घेत आहोत असे ही त्या म्हणाल्या.

इस्लामपूर येथील चातक इनोवेशन कंपनीच्या साह्याने हे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. या ड्रोन तंत्रामुळे आठ मिनिटात एक एकर ऊस पिकाची फवारणी पूर्ण होते. वेळ, श्रम, खर्च, औषधे यांची बचत तर होतेच शिवाय सुरक्षितपणे फवारणी केली जाते. विद्राव्य खते, जिवाणू, कीटकनाशके, ऊस पीक वाढीसाठी आवश्यक संप्रेरके यांची फवारणी करता येते. त्यामुळे आधुनिक पद्धतीच्या ऊस पीक पद्धती मध्ये उपयुक्त असलेल्या या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक  शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदी सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.लगेचच त्यांनी नूतन संचालक मंडळा समवेत मीटिंग घेऊन या उपक्रमाची घोषणा करून आपल्या कामाची पुढील दिशा स्पष्ट केली.

 युवकांना रोजगाराची संधी

या ड्रोन तंत्राद्वारे फवारणीसाठीच्या यंत्राची किंमत जास्त आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांना घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यासाठी बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अशा युवकांनी हे यंत्र घेण्याची तयारी दर्शविल्यास शाहू ग्रुपमार्फत त्यांना राजे बँकेच्या माध्यमातून वित्तपुरवठा केला जाईल. व शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये फवारणीचे काम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे अशा युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तर शेतकऱ्यांना फवारणीची सुविधा मिळणार आहे. असा दुहेरी फायदा या मधून होणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.