आमचे आमदार फुटणे शक्य नाही, जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही – पाटील 

मुंबई   –   निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीतील आमदार भाजपामध्ये येतील, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलंय.

ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो अशीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. मविआचे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, दानवे आणि इतर भाजपच्या नेत्यांकडून केल्या जात असणाऱ्या या दाव्याचा मंत्री जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले,  भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्याना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सूरु आहेत. आमचे २५ आमदार बाहेर पडणार आहेत मग आम्ही काय वेडे आहोत का? पुन्हा एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. एवढं सोप्प नाही राजीनामा द्यायचं आणि बाहेर पडायचं. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोकं सळो की पळो करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही. उलट भाजप आमदार आमच्या सरकारवर खुश आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.