नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो; संजय राऊत यांना फडणविसांचा टोला

मुंबई – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED ) कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील (Alibaug ) आठ भूखंड आणि दादरच्या (Dadar) फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

पत्राचाळ घोटाळ्यातील (Patrachaul scam) पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे संजय राऊत यांचा थयथयाट पाहायला मिळत असून आता ते विरोधकांना माध्यमांच्या समोरच शिवीगाळ करू लागले आहेत.

संजय राऊत हे ज्यांच्यामुळे अडचणीत आले आहेत त्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर राऊत यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. असा आरोप केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या टीकेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिली आहे.