शिंदे गटासोबत युतीची प्रा. जोगेंद्र कवाडे यांची घोषणा; राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट

Mumbai – पीपल्स रिपब्लिकन पक्ष (Peoples Republican Party) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाची अखेर युती झाली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे (Prof. Jogendra Kawade) यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल, असं प्रा. जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे हे सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्माला आले नाहीत. काही जण बाप लिडर होता, म्हणून लिडर झाले आहेत. शिंदे हे भीम सैनिकांप्रमाणे संघर्षातून वर आले आहेत. त्यामुळे या युतीचा अभिमान आहे. असं देखील ते म्हणाले.

शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासगामी करण्यासाठी व राज्यातील सर्व समाज समूहांच्या हक्कासाठी शिंदे आणि त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे. थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.