‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’ला काहीही कमी पडू देणार नाही – शिंदे

लतादीदींचा गौरव हाच महाराष्ट्राचा गौरव, सूर्य चंद्र असेपर्यंत लतादीदींचा आवाज कायम राहील

मुंबई – भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष, आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने लंताजली या संगीतमय आंदराजंली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक संगीत प्रेमी या नात्याने शेलार यांनी मेराक इव्हेंट यांच्या सहयोगाने  लतांजली  या भव्य कार्यक्रमाचे माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता मंगेशकर यांते पुतणे आदिनाथ मंगेशकर देखील उपस्थित होते. यावेळी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली.

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लतादीदी आपल्यात प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांचा आवाज काल, आज आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत लतादीदींचा आवाज अजरामर राहतील. त्यांच्या आठवणी शिवाय कुणाचा एक क्षण जात नाही. असा कुठला व्यक्ती किंवा असे कोणतेही क्षेत्र नसेल जिथे लतादीदींचा आवाज पोहोचला नसेल. जगात किती उलथापालथ झाली तरी सीमा-प्रांत-भाषा आणि देश असे कुठलेही भेद न ठेवता लतादीदींचा रसिक वर्ग कायम राहणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राची फार मोठी सेवा केली. महाराष्ट्राच नव्हे तर भारताचे कला – सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध केले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लतादीदींची आठवण आली तरी अंगावर शहारे येतात. ज्या ज्या वेळास महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा खजिना उघडून पाहू, त्या त्या वेळेस लतादीदींचा आवाज पुढच्या पिढ्यांना संमोहित करेल. महाराष्ट्राच्या मातीने जगाला हे अलौकिक असे रत्न दिले, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्याचे भाग्य मला मिळाले. आशिष शेलार म्हणाले या महाविद्यालयासाठी मी स्वाक्षरी केली. पण मी निमित्तमात्र आहे. लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय व्हावे, अशी आपल्या सर्वांचीच इच्छा होती. आता ते कलिना येथे होत आहे. या महाविद्यालयासाठी काहीही कमी पडू देणार नाही. हे शासन लतादीदींचा गौरव करेल. त्याच बरोबर मीरा-भाईंदर येथेही भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाची देखील उभारणी करण्यात आली आहे. एक हजार आसनक्षमता असलेल्या या नाट्यगृहाचे लवकरच लोकार्पण केले जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी जाहीर केले. पंतप्रधान मोदीजी देखील अयोध्या येथे लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक उभे करत आहेत, त्यांना देखील मी धन्यवाद देतो.

ज्येष्ठ अभिनेत्री, माजी खासदार हेमा मालिनी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला लतादीदींनी गायलेल्या गाण्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली. माझ्या शंभरहून अधिक गाण्यांना लतादीदींचा आवाज प्राप्त झालेला आहे. लतादीदी या सरस्वतीच्या वरदान होत्या. त्यांचा आवाज जेवढा भव्य होता, तेवढेच त्यांचे व्यक्तिमत्व भव्यदिव्य होते. आशिष शेलार यांनी एक खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला. अभिनेत्री काजोल यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. काजोल म्हणाल्या की, मी जेव्हा लतादीदींना भेटायचे तेव्हा त्यांची बोलण्यातली नम्रता, त्यांच्या स्वभावातली शालिनता मला प्रभावित करायची. त्यांचा आवाज त्यांच्यासारखाच प्रतिभाशाली होता. त्यांचा स्वर अजरामर राहील. यावेळी सिने स्टार अभिनेत्री राखी, आशा पारेख, मौसमी चटर्जी, पद्ममीनी कोल्हापूरे, नितू सिंग, बिंदू, रिना राँय, पुनम ढिल्लो, राणी मुखर्जी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका साधना सरगम, बेला शेंडे,शरयू दाते, संपदा गोस्वामी, निरुपमा डे (Famous singers Sadhana Sargam, Bela Shende, Sharyu Date, Sampada Goswami, Nirupama Dey) आदी गायिका तर निवेदक म्हणून संदिप पंचवटकर, आर.जे.गौरव यांच्या सह नामवंत वादक असे एकुण ५० कलावंत यामध्ये सहभागी झाले. तसेच संगीतकार आनंदजी, प्यारेलाल आदी यांची विशेष उपस्थिती होती.