हिजाबशिवाय वर्गात न जाण्याबाबत कर्नाटकातील विद्यार्थिनींचा हट्ट कायम

बंगरूळ – हिजाबबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले की, हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही आणि शालेय विद्यार्थी गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत. यासोबतच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.दरम्यान, ‘हिजाब घातल्याशिवाय आम्ही महाविद्यालयात प्रवेश करणार नाही’, असा हट्ट कर्नाटकच्या काही महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी बुधवारी न्यायालयाच्या आदेशानंतरही कायम ठेवला. उडुपी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील ६ मुस्लीम विद्यार्थिनीही बुधवारी वर्गात बसल्या नाहीत.

आपण याप्रकरणी कायदेशीर लढा देऊ असे सांगितले. महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन वर्गाच्या दुसऱ्या पूर्वतयारी परीक्षा सुरू असताना त्या गैरहजर राहिल्या.विशेष म्हणजे हिजाब वादामुळे पूर्वी अशांततेचे वातावरण पाहिलेल्या शिवमोगातील कमला नेहरू महाविद्यालयातही, आपण हिजाब घातल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश करणार नाही असे सांगून १५ मुस्लीम विद्याथिर्नी परत गेल्या.