खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापितांना बसणार जोरदार धक्का?

खेड – महाराष्ट्र राज्य खेड आळंदी विधानसभा अंतर्गत आम आदमी पार्टी युवा आघाडीकडून आज आप युवा संवाद संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. लोकांच्या, समाजाच्या मुलभूत प्रश्नांकडे सध्या राजकारणातील नेते मंडळी कानडोळा करीत आहेत. त्यासाठी समजाकारणात स्वत: पुढाकार घेऊन समाजाचं नेतृत्व करणे सध्याच्या घडीला अत्यावश्यक आहे. त्यामुळे आप युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचं मत खेड आळंदी विधानसभा मतदार संघाचे आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाला आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ राठोड, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य संघटक संदीप सोनवणे, पुणे संयोजक मुकूंद किर्दत, आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील महिला बचत गटांचे सन्मान देऊन त्यांचा सत्कार ही करण्यात आला. तसेच यावेळी अनेक युवा कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश देखील केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे म्हणाले की, ज्यावेळी आपला मतदार जात पात, धर्म विसरून मतदान करणार नाही. तोपर्यंत या देशात लोकशाही टिकणार नाही. रामाचं नाव घेऊन आपल्या देशाचा विकास करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला तळागळात जाऊन लोकांची कामे करावी लागणार. परंतु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांचा मेंदू त्यांच्याकडे गहाण ठेऊन घेतला आहे. त्यामुळे सुरूवातीला आपण नरेंद्र मोदी यांनी स्वत:कडे ठेऊन घेतलेला आपला मेंदू स्वत:कडे घेतला पाहिजे. तो त्यांचा विचार आपण पहिला बंद केला पाहिजे. असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात आमदारांचा मोठा लिलाव केला जातोय. एक एक आमदार ५० कोटींना विकला जातोय. या राजकारण्यांना आपल्या राज्यातील सर्वसामान्यांची कसलीच परवा नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन ही लोकं अशा पद्धतीचं काम करताहेत, त्याची देखील त्यांना लाज वाटत नाही. महिलांनाबाबत या सरकारमधील एक मंत्री शिव्या देतोय. महिलांनी कपडे कसे घालावे असे या राज्यात प्रश्न केले जातात. आपल्या सर्वांच्या आरक्षणावर गदा आणली जातीय. सरकारी शाळा बंद केल्या जाताहेत. आपल्या संविधानावर अघात केला जातोय. जर हे आपल्याला सर्व बदलायला हवं असेल तर आता आप शिवाय दुसरा पर्याय नाही. आम आदमी पार्टीने महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीबांसाठी यासाठी कामे केलीत. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपला पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ राठोड म्हणाले की, महाराष्ट्रात ग्रामीण भागात आम आदमी पार्टीचा असा युवा संवाद सोहळा पहिल्यांदाच होत असून येथील प्रस्थापितांना आता आम आदमी पार्टीची भिती मनात भरली आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर रात्रीतच पक्षाचे ७५ टक्के झेंडे लोकांनी काढून घेतले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण जर आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत दोन जरी आमदार निवडून आणले तरी आपल्या पक्षाला निवडणुक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होईल. सध्या आप हा देशात नंबर तिनचा पक्ष बनला आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका लढविणार असून यामध्ये आपण विजयी होऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, खेड आळंदी मतदार संघात सध्याच्या घडीला आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, ट्राफिकचा प्रश्न, असून मागील ५० वर्षापासून येथील राजकारणी नेत्यांनी याकडे नेहमी दुर्लक्ष केलं. पण देशाचा विकास कसा करायचा? लोकांना चांगल्या सुविधा कशा पोहचवायच्या हे दिल्लीत आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी करून दाखविलं आहे, आणि तेच धोरण घेऊन आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या मैदानात उतरली आहे.
आप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले की, आपल्या राज्यात सध्या दसरा मेळावा कुठे घ्यावा, सावरकरांवरील टीका, नेहरूंवरील टिका, मंदीर कुठे बांधावीत, हे प्रश्न् राज्यकर्तेंचे झाले आहेत. या प्रश्नांमुळे आपला विकास होणार नाही. तर येथील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले तर बदल होऊ शकतो. आजच्या घडीला युवकांना स्थान देणारा, पुढे आणणारा असा एकमेव पक्ष हा आम आदमी पार्टी म्हणून ओळखला जातो. वीज, पाणी, शिक्षण, याचबरोबर आपल्याला घरपोच आपली अत्यावश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी आप काम करीत आहे. त्याचं आपल्या सर्वांनासमोर दिल्ली हे उत्तम उदाहरण आहे.

दिल्ली, त्यानंतर पंजाब मध्ये पहिल्याच प्रयत्नात आपने सत्ता स्थापन केली आहे. आता पर्यंत आपचे देशात दोन मुख्यमंत्री असून तिसरा मुख्यमंत्री ८ डिसेंबरला शपथ घेणार असा विश्वास देखील गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवरून केला आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरीता आपने दहा राज्य निवडली असून त्यामध्ये महाराष्ट्रात देखील लोकसभेच्या निवडणुका आप लढविणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. असंही ते म्हणाले.

खेड आळंदी विधानसभा आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर म्हणाले की, आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि देशाची राजधानी दिल्लीचे यशस्वी मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली काम करीत असल्याचा आम्हा युवकांना अभिमान वाटतो. हा देश बदलला पाहिजे. ही व्यवस्था सुधारली पाहिजे आणि समाजाची उन्नती झाली पाहिजे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आणि लोकांनी समस्या मांडण्याच्या हेतूने आम्ही ‘‘युवा संवाद’’ हा कार्यक्रम नियोजित केला.

ते पुढे म्हणाले की, आम्ही या मतदार संघातील युवकांनी या संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हा या मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा ठरणार आहे. मतदार संघातील खेड्यापांड्यांमध्ये स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे, आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे, स्थानिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करुन दळणवळण सुधारणे, विविध प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे, एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणे, सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर भर देणे, इंद्रायणी नदी स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी विकास आराखडा तयार करणे, यासह खेड, चाकण आणि आळंदी नगरपरिषदेतील कारभार गतीमान आणि पारदर्शी करुन लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे यासाठी पुढील काळात युवकांची फौज उभा करुन आम आदमी पार्टीद्वारे मतदार संघ विकासाचे ‘रोल मॉडेल’ करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचंही मुयर दौंडकर यांनी सांगितले आहे.