मनसेच्या पाठिंब्यामुळे हेमंत रासनेंची बाजू झाली भक्कम, महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या

पुणे – पुण्यात सध्या चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकांच्या (Kasba Bypoll Election) प्रचारांचा पक्षांकडून जोर वाढला आहे. चिंचवडमध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे मैदानात आहेत. तर दुसरीकडे कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या समोर काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि इतर अपक्ष उमेदवारांचं आव्हान असणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असतांना मनसेने (MNS) सुरूवातीला तटस्थ भूमिका स्विकारली होती. मात्र आता मनसेने आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला (BJP) पाठिंबा जाहीर केला आहे. मागील काही महिन्यात घेतलेल्या मनसेने हिंदुत्वाच्या मुद्यांवरून राजकारण तापवलं होतं. यातच कसब्यातील मनसेच्या अनेक माजी नगरसेवकांनी अलिकडेच पक्ष बदलला आहे. त्याचा फायदा देखील हेमंत रासने यांना होण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना महायुतीचा म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी. आय. शिवसंग्राम, पतित पावन संघटना, लोक जनशक्ती आदींना पाठींबा जाहीर केला आहे. यातच आता मनसेने देखील हेमंत रासने यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

कसबा विधानसभा मतदार संघ हा मनसेचा पारंपरिक मतदार राहिलाय. हे आता मागील तीन विधानसभा निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहेत. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे रविंद्र धंगेकर उभे आहेत.  ते अगोदर मनसेचे पुर्वाश्रमीचे माजी नगरसेवक राहिले आहेत. तसेच त्यांनी 2009 मध्ये त्यांनी कसबा विधानसभा निवडणुक ही मनसेकडून लढविली होती. त्यावेळी त्यांनी तत्कालीन भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन आमदार गिरीश बापट यांना टक्कर दिली होती. रविंद्र धंगेकर यांना त्यावेळी 46 हजार 820 मत पडली होती, अन् 8162 मतांनी त्यांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभेत देखील मनसेने छाप सोडली होती. मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मत पडली.  त्यानंतर 2019 च्या विधानसभेत धंगेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.  आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मनसेच्या माजी नगरसेवक राहिलेल्या रूपाली पाटील  यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे पक्षप्रवेश केल्याने मनसेचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी तशी खदखद बोलूनही दाखविली होती.

यातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलिकडेच मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला होता. त्यासाठी मनसेने राज्यभरात आंदोलने करत राजकारण तापवून दिलं. याचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक मशिदीवरील भोंगे खाली उतरले. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा पुण्यात देखील मोठा फायदा झाला. याचबरोबर आता पुण्यात पोटनिवडणुक लागलीय. राज ठाकरे यांनी आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना जाहीर करून दिलाय. त्यामुळे रविंद्र धंगेकर, रूपाली पाटील यांनी मनसेला केलेला जय महाराष्ट्र. मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात मनसेने निर्माण केलेलं हिंदुत्वाचं राजकारण. यावरून कसब्यात मनसेच्या मतदारांचं मत परिवर्तन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. यातच 1990 पासून ते आजतागायत कसब्याच्या जागेवर भाजपने वर्चस्व राखलं आहे. सुरूवातीला अण्णा जोशी भाजपच्या तिकीटावरून कसबा मतदार संघावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1995 ते 2014 यादरम्यान गिरीश बापट यांनी कसबा मतदार संघ राखला होता. त्यानंतर गिरीश बापट खासदार झाल्यानंतर या मतदारसंघातूून मुक्ता टिळक आमदार झाल्यात. हेमंत रासने यांनी नगरसेवक, तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष पद भुषवलं आहे.  त्यामुळे आता भाजपने हेमंत रासने यांच्यावर विश्वास दाखवला आहे.  यातच सध्या संपुर्ण राज्यात आघाडीत अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसताहेत. हे सर्व परिस्थिती लक्षात ठेऊन या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांची कसब्यातील बाजू अधिक मजबूत होऊ पाहत आहे. त्यामुळे येत्या 02 मार्चला मतदार कोणाच्या पारड्यात कसबा विधानसभा टाकणार? ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.