पुण्यात शिवसेनेला खिंडार ; किरण साळी, अजय भोसले देणार राजीनामा

पुणे : राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत. याचाच प्रत्यय पुण्यात देखील पाहायला मिळाला.

काल दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट पुण्यात आले. शिंदेशाही पगडी घालून एकनाथ शिंदे यांचे पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, किरण साळी, अजय भोसले, विजय शिवतारे उपस्थित होते. हडपसर येथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि लगेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांच्या धावत्या भेटीचाही पुण्यातील शिवसेनेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. फक्त काही मिनिटेच मुख्यमंत्री शिंदे पुण्यात होते. मात्र या धावत्या भेटीनंतर पुणे शहरात शिवसेनेला खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी आज ( राजीनामा देणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील.