पहिल्या दोन आठवड्यातले पेन ड्राईव्ह बॉम्ब हे फारच फुसके निघाले – सुप्रिया सुळे

मुंबई : भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापराबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसरं काहीच बोलायला मार्ग नाही म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आजकाल महाराष्ट्रात कागद नाही तर पेनड्राईव्ह दाखवला जातो. मात्र पहिल्या दोन आठवड्यातले पेन ड्राईव्ह बॉम्ब हे फारच फुसके निघाले, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

महागाईसारखे अत्यंत गंभीर विषय आज देशासमोर आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या विषयावरून लोकांचे लक्ष भरकटवले जात असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या. आधी कोविडमुळे तसेच आता रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे व्यावसायिकांना आपल्या मालाची निर्यात करताना फार अडचण होत आहे. मात्र केंद्र सरकारकडून यावर मार्ग काढण्याऐवजी सूडाचं राजकारण सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

मला राष्ट्रीय सुरक्षेची फार चिंता वाटत आहे. जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा आपण मोठी चौकशी लावतो. त्यामुळे ईडी-सीबीआय कुणावर रेड करणार आहे, यासंदर्भातील बातम्या जर ४-५ दिवस आधीपासूनच बाहेर येत असतील तर या संस्थांच्या स्वायत्ततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. मी मा. पंतप्रधान आणि मा. गृहमंत्र्यांना एक नागरिक आणि एक महिला म्हणून न्याय मागतेय की अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होणार असेल, तर ही चिंतेची बाब आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.