किरीट सोमय्या हे फालतू कार्यकर्ते आहेत, श्रीरंग बारणे यांचा हल्लाबोल

सोलापूर – परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचनालयाने छापे टाकल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परब यांच्यासह मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता शिवसेनेकडून देखील सोमय्या यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. खासदार श्रीरंग बारणे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार बारणे यांनी  सोमय्या यांना प्रत्युत्तर दिले.

खासदार बारणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आलं आहे, तेव्हापासून भारतीय जनता पक्ष हे सरकार लवकरच पडेल, असं सातत्याने सांगत आलं आहे. भाजप हा सत्तापिपासू पक्ष असून भाजपचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, त्यामुळंच खालच्या थराला जाऊन भाजपचे नेते अशी टीका करतात. माजी खासदार किरीट सोमय्या हे फालतू कार्यकर्ते आहेत, ते जी टीका करतात, ते पटण्यासारखं नाही आहे, असं म्हणत मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार तोफ डागली.