खचू नका, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका; न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष सोबत – अजित पवार

मुंबई  – विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना मंगळवारी विधानभवनाच्या प्रवेशव्दारावर समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली, त्यांच्या तब्बेतीची आस्थेने चौकशी केली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.

कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, असा धीर देत, टोकाचे पाऊल उचलू नका अशी विनंती करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना आज दिले.

शेतीच्या प्रश्नामुळे त्रस्त असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानभवनाच्या प्रवेशव्दारावर समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यामध्ये सुभाष देशमुख काही प्रमाणात भाजले आहेत. त्यांना उपचारार्थ मुंबई (Mumbai) येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये (J.J. Hospital)दाखल करण्यात आले आहे.

आज  सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शेतकरी सुभाष देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यांची अडचण जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनंती केली. त्यांच्या शेतीचा प्रश्न सोडविण्यासाठी विरोधी पक्षाच्यातवीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अजित पवार यांनी दिले.