मंत्र्याने रूममधून बाहेर काढले… एनटीआर यांनी पक्ष काढून थेट सरकारच बनवले 

हैद्राबाद –  सुप्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेते नंदामुरी तारका रामाराव (Nandamuri Taraka Rama Rao) म्हणजेच एनटी रामाराव  (एनटीआर) (N.T. Ramarao) यांना मानणारा एक मोठा वर्ग दक्षिण भारतामध्ये आहे. एनटीआर हे अभिनय क्षेत्रात जेवढे मोठे नाव होते तेवढेच मोठे नाव राजकारणात देखील होते मात्र ते राजकारणाकडे कसे वळले. याबाबत आपण आज या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण एनटीआर यांच्याबाबत अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

एनटी रामाराव यांचा जन्म २८ मे १९२३ रोजी कृष्णा जिल्ह्यातील निम्माकुरू गावात झाला. पण गावात चांगली शिक्षण व्यवस्था नसल्यामुळे ते विजयवाडा येथे आपल्या मामाच्या घरी आले. तिथून पदवी घेतली. त्यानंतर मद्रास सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी काही दिवस उपनिबंधक म्हणूनही काम केले. पण त्यांचे मन नौकरीत रमले नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1949 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट मन देशम (Mana Desam)  प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. पुढे अनेक तेलुगू चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रामाराव यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना एनटीआर हे एकदा नेल्लोरच्या दौऱ्यावर होते. नेल्लोर हे आंध्र प्रदेशातील एक लहान शहर आहे आणि त्याकाळी छोट्या शहरांमध्ये चांगल्या हॉटेल्सची कमतरता होती. त्यामुळे रामाराव सरकारी सर्किट हाऊसमध्ये गेले. पण तिथे पोहोचल्यावर कळलं की इथेही सगळ्या खोल्या बुक झाल्या आहेत. एक खोली जी रिकामी असल्याचे दिसत होते ती खोली सुधा एका राज्य सरकारच्या एका मंत्र्याच्या नावाने बुक करण्यात आली आहे. एन.टी. रामाराव विनंती केल्यावर त्यांना मंत्री येण्यापूर्वी काही तास ही खोली वापरण्याची परवानगी दिली.

खोलीत गेल्यानंतर रामाराव बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले. ते नुकतेच अंघोळ करत होते की तोपर्यंत तिथे ती खोली बुकिंग केलेले मंत्री महोदय आले. मंत्र्याने आपल्या खोलीत आणखी एक व्यक्ती पाहिल्यावर सर्किट हाऊसच्या केअर टेकरला झाप झाप झापलं. यानंतर एनटी रामाराव यांना सर्किट हाऊसची खोली रिकामी करावी लागली. या घटनेने रामारावांना हादरवून सोडले. काही दिवसांनी एनटी रामाराव चेन्नईला पोहोचले. त्याचा मित्र नागी रेड्डी याला ही हकीकत सांगितली. त्यांची  कहाणी ऐकून नागी रेड्डी त्याला म्हणाले, तुम्ही कितीही संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली तरी खरी शक्ती नेत्यांकडेच असते. हे ऐकल्यानंतर रामारावांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. पुढे 29 मार्च 1982 रोजी त्यांनी हैदराबादमध्ये त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली आणि आपल्या पक्षाला तेलगुदेसम नाव दिले.

दरम्यान, काही दिवसांनंतर राजीव गांधी (Rajiv Gandhi) हे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस असताना ते आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी टी अंजय्या हे आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते.  राजीव गांधी हे जेव्हा हैदराबादला पोहोचले. त्यावेळी त्यांना  पाहण्यासाठी हैदराबादच्या विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. राजीव गांधींचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री टी अंजय्याही विमानतळावर पोहोचले. विमानतळावर अनपेक्षितपणे मोठी गर्दी झाल्याचे पाहून राजीव गांधी संतापले.  त्यांनी टी.अंजय्या यांना अतिशय वाईटपणे सर्वांसमोर जाहीरपणे फटकारले.

या प्रसंगाचा पुरेपूर फायदा घेण्याचा एनटी रामाराव निश्चय केला. रामाराव यांनी राजीव गांधींनी टी अंजय्या यांचा केलेला अपमान हा आंध्र प्रदेशातील जनतेचा अपमान असल्याचे म्हटले आणि जनतेने काँग्रेसला धडा शिकवण्याचे आवाहन केले. यानंतर अवघ्या 9 महिन्यांनी झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत NTR यांनी कमाल केली. आंध्र प्रदेशात त्यांच्या मित्रपक्षांसह त्यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. पक्ष स्थापन केल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांतच दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन केले आणि अशा पद्धतीने NTR यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला.