नितेश राणेंचं आता थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई – काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत. या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत आहेत तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे तसेच काही मंडळी यावर टीका देखील करताना दिसत आहेत.

दरम्यान, आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे. भाजपा आमदार राणे यांनी ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाले, “जम्मु काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, याआधीच गुजरात आणि हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त केला आहे.