ब्रिटिशकालीन कालबाह्य कायदे बदलण्याची गरज – भगत सिंह कोश्यारी

मुंबई : स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे होत आहेत, तरीदेखील आपल्या देशात अनेक ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

जुहू विले पार्ले मुंबई येथील मा. कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. १३) संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी न्या. दत्ता यांच्या पत्नी झुमा दत्ता, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घेलानी, विश्वस्त जयंत घेलानी, जनक ठक्कर व डॉ. मिनू मदलानी प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी, विधिज्ञ सतीश मानेशिंदे व इतर निमंत्रितदेखील यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन सर्वंकष अध्ययन केले पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचादेखील अभ्यास केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे तसेच विधी विद्यार्थ्यांनी व वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे राज्यपालांनी सांगितले.