चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; पुन्हा आली टाळेबंदी करण्याची वेळ

बीजिंग – चीनमध्ये कोविड 19 नं पुन्हा डोकं वर काढलं असून शनिवारी एका दिवसात पंधराशे तर रविवारी 3 हजार 100 नवबाधित आढळले. चीनमधला सध्याचा कोविड-19 चा प्रादुर्भाव हा 2020 मध्ये वूहानमध्ये झालेल्या उद्रेकाच्या खालोखाल असल्याचं मानलं जात आहे. सध्या आढळणारे नवीन बाधित मुख्यत: जिलीन या चीनच्या ईशान्य भागातले आहेत. या भागात अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

सेंझनमध्ये पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली असून शांघायमध्ये मोठे निर्बंध घालण्यात आले आहेत. राजधानी बीजिंगमध्ये कोविड 19 ची कोणतीही लक्षणं नसलेले रुग्ण आढळत असून चीननं प्रथमच चाचण्या करण्यासाठी रॅपिड अॅंटीजेन संचांना मान्यता दिली आहे. बीजिंगमध्ये नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावेत, आणि शहरात येणाऱ्या प्रवाशांनी आल्यानंतर 7 दिवस गर्दीची ठिकाणं, उपाहरगृह अशा ठिकाणी जाऊ नये आणि सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊ नये, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांनी कोविड 19 ची चाचणी नकारात्मक असल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केलं जात आहे. चीनमधली रुग्णसंख्या ही इतर देशातल्या रुग्ण संख्येपेक्षा कितीतरी कमी असली, तरी चीननं शाळांचे वर्ग पुन्हा ऑनलाइन पद्धतीनं सुरू केले असून बालवाड्या बंद केल्या आहेत.