लोकसभा निवडणूक 2024 : गमावलेल्या जागा जिंकण्यासाठी ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना भाजपने दिली महत्त्वाची जबाबदारी

लखनौ – लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. या संदर्भात पक्ष शीर्ष नेतृत्वापासून बूथ स्तरापर्यंत काम करत आहे. त्याचबरोबर या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने यूपीमध्ये विशेष योजना आखली आहे. 2019 च्या निवडणुकीत ज्या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले त्या जागांवर पक्षाचे लक्ष आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जागांवर भाजपने आपली रणनीती तयार केली आहे. त्यासाठी पक्षाने या जागांची विशेष जबाबदारी काही बड्या नेत्यांवर सोपवली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्याकडे सहारनपूर, नगीना आणि बिजनौरची जबाबदारी आली आहे. दुसरीकडे, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्याकडे रायबरेली, श्रावस्ती, आंबेडकर नगर आणि मऊची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याशिवाय राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांना मुरादाबाद, अमरोहा, संभल आणि मैनपुरीची जबाबदारी देण्यात आली आहे . विशेष म्हणजे जितेंद्र सिंह यांना ज्या जागांवर जबाबदारी मिळाली आहे, त्या सर्व जागा सपाच्या ताब्यात आहेत. आणखी एक केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी (Annpurna Devi) यांच्याकडे जौनपूर, गाझीपूर आणि लालगंज लोकसभा जागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

या सर्व जागांवर पक्षाच्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत हे नेते चर्चा करणार आहेत. या सर्व मंत्र्यांचा प्रत्येक जागेवर तीन दिवसांचा मुक्काम असणार आहे. प्रत्येक सीटवर फीडबॅक तयार केला जाईल. हा अभिप्राय केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवला जाईल. ज्यामध्ये मागील पराभवाची कारणेही सांगितली जाणार आहेत. याशिवाय सर्व खासदार आणि आमदारांना स्वतंत्र बूथही देण्यात आले आहेत.