आमदार रवी राणा यांच्या गोदामातून भोंगे गायब; १०० साड्या आणि किराणा साहित्यही चोरीला

अमरावती : अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या गोदामातून भोंगे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्याशिवाय त्यांच्या भानखेडा ते मोगरा मार्गावरील शेतातील दोन गोदामातून चोराने ५ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा किराणा लंपास केला आहे. या घटनेची तक्रार गोदामाची देखरेख करणारे सुशील गजानन ठाकूर (५४, रा. संभाजीनगर) यांनी ४ सप्टेंबरला बडनेरा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सुशील ठाकूर हे आमदार रवी राणा यांच्या भानखेडा ते मोगरा मार्गावर असलेल्या शेतातील गोदामाची देखरेख करतात. भानखेडा बु. येथील शेतात दोन गोदाम असून, तेथे आमदार रवी राणातर्फे गरीब व गरजूंना वाटण्यात येणारे किराणा साहित्य ठेवलेले होते. सुशील ठाकूर ४ सप्टेंबरला गोदामात गेले असता, ते साहित्य चोरी झाल्याचं लक्षात आले. त्यांना तेथील साहित्य अस्ताव्यस्त आणि कमी असल्याचे दिसून आले.

चोरांनी गोदामातील किराणा साहित्य आणि साऊंड सिस्टिम भोंगे, एम्प्लीफायर युनिट लंपास केल्याचे समोर आलं आहे. चोरट्याने गोदामाच्या दरवाजाला असलेली जाळी तोडून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी गोदामातून गरजूंना वाटपासाठी ठेवलेले १ लाख ५५ हजारांचे सोयाबीन तेल, २१ हजारांची साखर, ३० हजारांची चणा डाळ, २० हजारांच्या १०० साड्या, ४८ हजार १०० रुपयांचे ॲल्युमिनियमचे भोंगे, ६३ हजार रुपयांचे ५८ एम्प्लीफायर असा सुमारे ५ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मटाने याबाबत वृत्त दिले आहे.