‘मेरी माटी मेरा देश’ अभियान लोकसहभागातून यशस्वी करावं; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

Meri Mati Mera Desh : स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेने या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शुक्रवारी केले.

बावनकुळे यांच्या हस्ते कुलाबा येथील कार्यक्रमात या अभियानाचा राज्यव्यापी प्रारंभ करण्यात आला . त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, अभियान संयोजक राजेश पांडे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, मकरंद नार्वेकर, हर्षदा नार्वेकर, जनक संघवी,भाजपा कुलाबा अध्यक्ष हेमंत मेहर,महिला अध्यक्ष प्रविना मोदी, युवा अध्यक्ष अमित ठाकर, जिल्हा महामंत्री हेमांशु शहा, दिलीप तांडेल आदी उपस्थित होते.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ची भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आणि साह्यभूत – Ajit Pawar

बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाड्यावस्त्यांमधून ‘अमृत कलश यात्रा’ निघणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. अमृत कलशांमध्ये मूठभर माती, धान्य गोळा करून हे कलश ३१ ऑक्टोबर ला दिल्लीला अमृतवाटिकेच्या निर्माणासाठी नेले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ निर्माणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. अनेक कलशांमधून आणलेल्या माती आणि धान्याचे मिश्रण वापरून या अमृतवाटिकेचे निर्माण होणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ देशातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ ठरणार असून अनेक देशी विदेशी पर्यटक इथे भेट देतील. हे संपूर्ण देशाचे अभियान असून त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

कुलाब्यातील कोळी बांधवांनी पारंपरिक वेशात या अभियानात सहभाग घेतला . अभियान संयोजक राजेश पांडे यांनी उपस्थितांना पंचप्रण शपथ दिली.