‘…म्हणून आम्ही प्रचाराला लागलो’, ओबीसी आरक्षणावर बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य

नाशिक : इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटाची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं या आकडेवारीची मागणी केंद्राकडे केली होती.मात्र, ही आकडेवारी कच्च्या स्वरुपात असून सदोष असल्यानं ती वापरण्यास योग्य नसल्याची भूमिका केंद्र सरकारनं न्यायालयात मांडली होती.

केंद्राची ही भूमिका विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. त्यामुळं 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणुका घ्याव्यात, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं आवश्यक अधिसूचना जारी करावी असे निर्देश न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खडंपीठानं दिले. दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

यावर आता कॉंग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी कोर्टात जे जे करता येईल. ते आम्ही केलं. राज्य सरकार कुठेही कमी पडले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती केली आहे. सगळ्या निवडणुका एकत्रच घ्या हा आमचा आग्रह आहे. पण आयोग थांबणार नसेल तर आमचे उमेदवार तयार आहेत. उघड्यावर थोडीच सोडता येणार आहे. म्हणून आम्ही प्रचाराला लागलो आहोत’, असं थोरात म्हणाले.