‘पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?’, मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्याविरोधात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. त्यामुळे दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहलाना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. दुकानदारांना व्होटबँक पॉलिटिक्सपासून दूर ठेवा. दुकानाला मराठी पाट्या लावू, पण मोठ्या अक्षरातील मराठी पाट्यांची सक्ती नको, अशी भूमिका विरेन शाह यांनी घेतली आहे. या भूमिकेवरुन आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

विरेन शहा यांच्या या भूमिकेविरुद्ध मनसेने आता थेट खळ्ळखट्याकचा इशारा दिला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीं ट्विट करत मराठी पाट्या लावण्यास विरोध करणाऱ्या करणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. ‘ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?’ असा धामीवजा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे.