‘मराठीवर इतकंच प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्या’

औरंगाबाद : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्याविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दंड थापटले आहेत. सरकारला जर मराठीवर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात. अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांची राज्य सरकारकडे केली आहे. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार असा सवाल इम्तियाज जलील यांचा राज्य सरकारला केला आहे.