मॉडेलचे राजभवनातील फोटो व्हायरल, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुन्हा अडचणीत!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नितीन गडकरी यांच्याशी तुलना करत राज्यपाल कोश्यारी टीकेचे धनी ठरले आहेत. महाविकास आघाडी, मनसे व अन्य नेते राज्यपालांविरुद्ध आक्रमक झाले असून त्यांना या पदावरून हटवण्याची मागणीही केली जात आहे. अशातच आता राज्यपाल कोश्यारी पुन्हा नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.

नुकतीच अभिनेत्री आणि मॉडेल मायरा मिश्रा (Maera Mishra) हिने राजभवनात राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून राजभवनातील आपले फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिच्याबरोबर जेष्ठ अभिनेत्री मनिषा कोईराला यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मायरा मिश्राने राज्यपालांबरोबरच त्यांच्या राजभवनातील खुर्चीसोबतही फोटो काढले आणि तो इंस्टाला शेअर केले आहेत. यावरून मनसेने राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत.

मनसे नेते मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनी याबद्दल ट्वीट केले आहे. ‘ही बाई कोण? अभिनेत्री आणि माॅडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?’, असा सवाल मनोज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.