मनसे भाजपाची सी टीम आहे; राज ठाकरे यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही – यशोमती ठाकूर

अमरावती – मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अनेक मुस्लीम संघटनांनी (Muslim organizations) आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केलाआहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआचे नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, आता मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यांनी या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. त्या म्हणाल्या, राज ठाकरे जे पण काय करतात, ते अतिशय चुकीचे करीत आहेत. राज ठाकरे यांनी असे करणेही चुकीचेच आहे. महाराष्ट्र राज्यात सलोख्याचे आणि शांतीचे वातावरण राहावे यावर राज ठाकरे यांनी बोलले पाहिजे. राज ठाकरे “जिधर बम, उधर हम” अशा गोष्टी करीत आहेत. तेव्हा त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही. ते अशा गोष्टी का बोलत आहेत त्याची सर्व सामान्य जनतेला माहिती आहे. भाजपाची सी टीम म्हणून ते काम करीत आहेत. असं त्या म्हणाल्या.