वाढलेल्या ढेऱ्या कमी करा, नाहीतर राजीनामा द्या; खासदार ओमराजे निंबाळकरांनी अधिकऱ्यांना झापलं

मुंबई- धाराशिव या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत विविध योजनांचा आढावा खासदार ओमराजे निंबाळकर (Mp Omraje Nimbalkar ) आणि आमदार कैलास पाटील यांनी घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम करा, योगा करा असा सल्ला देत खासदार ओमराजे निंबाळकरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भर बैठकीत झापलं आहे. एवढंच नाही तर हे शक्य नसेल तर राजीनामा द्या असंही ओमराजे निंबाळकर यांनी बजावलं आहे.

ओमराजे यांनी पोकरा योजनेच्या आढावा बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अधिकाऱ्यांचं पोट वाढलेलं पाहून त्यांनी सरळ त्यांना झापलं आहे. बी.पी., शुगरवाल्यांनो जरा व्यायाम आणि योगा करत जा. ढेऱ्या कमी करा आणि जमत नसेल तर राजीनामा द्या असं सांगितलं आहे.

लोहारा या तालुक्यातील सास्तुर या ठिकाणी कार्यरत असलेले कृषी पर्यवक्षेक जी. एस. सगर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना १ मेच्या रात्री घडली. सगर हे हत्तरगाचे मूळ रहिवासी होते आणि सास्तूर या ठिकाणी कृषी पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या निधनाची माहिती कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आली. त्यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त करत ओमराजे निंबाळकर यांनी तिथे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. वजन आणि वाढलेलं पोट कमी करा अन्यथा राजीनामा द्या असं त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.