पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुंबईचा संघ आज भिडणार राजस्थानशी

 मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या(IPL) या मोसमातील 9वा सामना शनिवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे दुपारी साडेतीनपासून हा सामना रंगणार आहे.

या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला.  दुसऱ्या बाजूला राजस्थान संघाने पहिला सामना 61 धावांनी जिंकला होता. रोहितच्या (Rohit Sharma)कर्णधारपदी मुंबईला या सामन्यातून विजयाचे खाते उघडायचे आहे, तर संजू सॅमसनच्या (Sanju Samsan)राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.

दोन्ही संघात जबरदस्त खेळाडू आहेत, जे सामना रोमांचक बनवतील.  आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान 25 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या 25 सामन्यांपैकी मुंबईने 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थानने 11 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. मात्र, गेल्या मोसमात मुंबई आणि राजस्थान यांच्यात दोन सामने झाले, त्यात मुंबईने बाजी मारली.

आता हा विक्रम मुंबई राखू शकणार की नाही हे पाहावे लागेल. राजस्थानच्या संघाने पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे दमदार खेळ दाखवला, त्यानुसार राजस्थानला पराभूत करणे मुंबईसाठी खूप कठीण असणार हे स्पष्ट आहे.