‘कोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार

मुंबई  – “कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा (Gudhi Padwa) आणि मराठी नववर्ष (Marathi New Year) सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांना, जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी  बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे.

दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचे संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता, सुरक्षिततेची सवय वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया… निरोगी, बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया असे आवाहनही शुभेच्छा संदेशात केले आहे.