‘भाजप व राष्ट्रवादी युतीबाबत मुनगंटीवार-शेलारांचे वक्तव्य हा अविश्वास निर्माण करण्याचा केविलवाणा प्रकार’

मुंबई – सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार ( Sudhir Mungantiwar and Ashish Shelar ) यांनी २०१७ मध्ये भाजप व राष्ट्रवादी युतीबाबत ( BJP and NCP alliance ) केलेले वक्तव्य हा महाविकास आघाडीत संभ्रम व अविश्वास निर्माण करण्याचा केविलवाणा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे अनेक मुहूर्त गेल्या अडीच वर्षांमध्ये आले आणि गेले तरी देखील महाविकास आघाडी भक्कम आहे असेही महेश तपासे ( Mahesh Tapase ) यांनी ठणकावून सांगितले.

२०१४ ते २०१९ महाराष्ट्रामध्ये भाजप व शिवसेनेचे सरकार होते आणि २०१७ मध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तीन पक्षाचे सरकार बनावे असा कुठलाही संविधानिक पेचप्रसंग निर्माण झाला नसताना आशिष शेलार व सुधीर मुनगंटीवार यांनी हे विनोदी वक्तव्य कसे काय केले असा सवाल महेश कापसे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यसरकार कारभार प्रामाणिकपणे करीत आहे त्यामुळे सरकार अस्थिर करण्याचा अजून एक केविलवाणा व कुटील डाव म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांच्या विरोधात संशयाचे वातावरण निर्माण करणे या एकमेव उद्देशाने आशिष शेलार व सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचे वक्तव्य केले आहे असेही महेश तपासे म्हणाले.