‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

Badruddin Ajmal : ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बलात्कार, लूटमार, दरोडा सगळ्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम नंबर वन आहेत. तसंच तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक लागतो असं त्यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, “चोरी, दरोडा, बलात्कार या सगळ्यात मुस्लिम नंबर वन आहेत. तसंच तुरुंगात जाण्याच्या बाबतीतही आपला पहिला क्रमांक लागतो. आपल्या (मुस्लिम समुदाय) मुलांकडे शाळेत किंवा महाविद्यालयात जायला वेळ नसतो. मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो. जरा स्वतःच्या मनाला विचारा की हे काय करत आहात. सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मुस्लिम आघाडीवर आहेत आणि ही अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे. असं त्यांनी म्हटलं होतं.

एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले, लोक चंद्रावर जात आहेत, सूर्यावर यान धाडत आहेत, पीएचडी करत आहेत. एकदा जरा पोलीस स्टेशनला जाऊन बघा तिथे तुम्हाला समजेल सर्वाधिक गुन्हेगार कोण? अब्दुल रहमान, अब्दुल रहीम, अब्दुल मजीद, बदरुद्दीन, सिराजउद्दीन (Abdul Rahman, Abdul Rahim, Abdul Majeed, Badruddin, Sirajuddin) अशीच नावं तिथे गुन्हेगारांच्या यादीत सापडतील. ही गोष्ट क्लेशदायक नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.