नागपूर : अनधिकृत बांधकामासाठी ३ हजार ०३३ भूधारकांना नोटीस, तर ३५ जणांवर कारवाई

नागपूर : नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ३ हजार ०३३ जमीन मालकांना नोटीस बजावली आहे. यापैकी ३५ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या किती अनधिकृत बांधकामावर कारवाई केली याचा तपशील आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत विचारला होता. या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.

शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची जबाबदारी देखील याच प्राधिकरणाकडे असून, यासंबंधीचा  आराखडा तयार करण्याचे काम खाजगी कंपनीला देण्यात आल्याची चर्चा आहे. यातील तथ्य जाणून घेण्याचा आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, कोणतेही बांधकाम करावयाचे असल्यास जमीन मालकाला विकास शुल्क भरुन परवानगी घेणे गरजेची आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी एकूण १२ हजार ३७८ अर्ज प्राप्त झाले असून, बाबतचा आराखडा तयार करण्याचे काम कोणत्याही खाजगी कंपनीला देण्यात आले नसल्याचे त्यानी स्पष्ट केले.