‘मुंबई बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावे’

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांच्याविरोधात मुंबई सहकारी बँक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दरेकरांवर खोचक टीका केली आहे.

मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विदयमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुंबई सहकारी बँकेची लूट करण्यात आली. लेखापरिक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहे त्यानुसार सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते तेव्हा करेल तो भरेल असे म्हणणारे भाजपाचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली नाही, असे पटोले म्हणाले.