Nana Patole | “नाना पटोले माझं दैवत; एकदा काय, दहा वेळा पाण्याने पाय धुवेन”, कार्यकर्त्याचं कट्टर उत्तर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अकोला येथील कार्यकर्त्याच्या हातून पाय धुवून घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांना घेरले आहे. अशातच पटोलेंचे पाय धुणारे कार्यकर्ते विनोद गुरव यांनी या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले माझे दैवत आहेत, एकदा नाही दहा वेळा मी त्यांचे पाय धुवेन, असं उत्तर टिकाकारांना दिलं आहे.

विजय गुरव म्हणाले, नाना भाऊ पटोले (Nana Patole) माझे दैवत आहेत, एकदा नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेन. नाना पटोले वाडेगावला एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी ते पोहोचले. पोलिसांनी सांगितलं की गाडी आतपर्यंत जाईल, मात्र नानांनी सांगितलं की सर्वसामान्य भक्तांप्रमाणे पायी जाणार. श्रींचं दर्शन घेतल्यानंतर भाऊंचे पाय चिखलाने भरल्याचं मला दिसलं. म्हणून मी पाणी आणून त्यांच्या पायावर टाकू लागलो, तर त्यांनी मला मनाई केली, असं विजय गुरव यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, राम कदम, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांना माझं आवाहन आहे, नाना भाऊ पटोले माझे दैवत आहेत, मी एकदा नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेन. माझ्या कुटुंबाबाबत किंवा नानांबाबत कुठलंही राजकारण करु नका. याच कार्यक्रमात नानांनी एका वृद्ध महिलेला हाताला धरुन स्टेजवर नेलं आणि साडीचोळीने तिचा सत्कार केला, हे मीडियाने का दाखवलं नाही? असा सवाल विजय गुरव यांनी विचारला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप