नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात देशाचा नावलौकिक वाढवला आहे – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – कोल्हापूर मधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही; असा टोला भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज रुईकर कॉलनी येथे कॉफी पे चर्चाचे (Coffee Pe Charcha)आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा उमेदवार सत्यजित कदम, सहसेवा ट्रस्टचे अध्यक्ष सन्मति मिरजे यांच्या सह भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, कोल्हापुरकरांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले. हे दाखवताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली होती की, पुढच्या दिवाळीला कोल्हापुरकरांची अंघोळ थेट पाइपलाइन द्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने घालू. पण मुळात थेट पाइपलाईनचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी(PM Narendra Modi)यांनी संपूर्ण जगात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांनी हिंदुंचे मानबिंदू पुनर्स्थापित करुन, हिंदूंना प्रतिष्ठा मिळवून दिली. यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचे दमन केले जात होते. तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींच्या घरात धार्मिक पूजाअर्चाचे अतिशय कटाक्षाने पालन होत होते. पण इतरांना मात्र हिंदुंना धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पूजाअर्चनेला मज्जाव केला जात होता. त्यामुळे या ढोंगी लोकांपासून माननीय मोदीजींनी‌ सर्वांना मुक्त करुन, त्यांना आपली आराधना करण्याचे स्वतंत्र्य मिळवून दिले आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, विधानसभेची पोटनिवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होण्याची गरज होती. पण कॉंग्रस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने काहीही केले नाही. उलट कोल्हापूरकरांच्या माथी टोलचा भुर्दंड मारला. पण माननीय देवेंद्र फडणवीस आणि दादांनी ४७३ कोटी रूपये देऊन, टोलपासून मुक्त केले. थेट पाइपलाइनची घोषणा करुन आता किती वर्ष झाली. पण आता हा पांढरा हत्ती ठरतोय का? अशी शंका निर्माण होत आहे. कारण थेट पाइपलाईनची घोषणा होऊन बरीच वर्षे झाली, तरी अजून कोल्हापुरकरांना पाणी मिळाले नाही. उलट त्याची कॉस्ट दिवसागणिक वाढत आहे. सत्यजित कदम यांनीही महापालिकेच्या कारभाराचा हिशोब मांडला‌. काॅंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रसेने कोणतीही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.