खार पोलीस स्टेशनबद्दल बोललेच नव्हते, चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनीत राणांचं स्पष्टीकरण

मुंबई : मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला ( Lok Sabha Speaker Omprakash Birla ) यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने ( Lok Sabha Secretariat ) राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे.

मात्र आता नवनीत राणा यांच्या वतीने त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत ते सांगत आहेत की, “माझ्या आशिलाने केलेल्या विनंतीनंतर हा व्हिडीओ तयार करत असून त्यांच्या वतीने ही वक्तव्यं करत आहे. एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नवनीत राणा यांनी अटकेत असताना पोलिसांकडून मुलभूत सुविधा मिळाली नसल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हे ट्वीट केलं आहे. मला फक्त हे स्पष्ट करायचं आहे की, अटक केल्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये असतानाचा व्हिडीओ संजय पांडे यांनी ट्वीट केला आहे. तिथे अधिकाऱ्यांनी चहासाठी विचारलं होतं, याबद्दल काही म्हणणं नाही.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, पण ते रात्री १ वाजेपर्यंत खार पोलीस स्टेशनमध्ये होते. नंतर त्यांना सांताक्रूझमधील जेलमध्ये पाठवण्यात आलं. रात्रभर आणि कोर्टात हजर करेपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात आलं होतं. नवनीत राणा यांनी केलेले आरोप खार पोलीस ठाण्यात होते तेव्हाचे नसून सांताक्रूझमधील जेलमध्ये असताना मिळालेल्या वागणुकीबद्दल आहेत.