ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिकांची याचिका फेटाळली

मुंबई – मंत्री नवाब मलिक यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. ईडीच्या (ED) कारवाईविरोधात केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा (Nawab Malik) दावा चुकीचा असल्याची टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. ईडीनं केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.
नवाब मलिक यांची याचिका फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर तपशीलवार सुनावणी आवश्यक असल्याचं नमूद केलं. “याचिका तपशीलवार ऐकायची असल्याने, तसेच याचिकेतील काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा आवश्यक असल्याने सुटकेचे अंतरिम आदेश काढता येणार नाहीत”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयाने नवाब मलिक यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मलिक आता कोणत्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, मलिक यांना रितसर जामीन अर्ज करण्याचा पर्याय खुला असल्याचंही कोर्टाने म्हटलं असून  आता ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.