वाढत्या बेरोजगारीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

मुंबई- देशात युवकांना रोजगार व नोकरी उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर येत आहे. राज्यातील तलाठी पदासाठी जाहीर केलेल्या 4644 नोकऱ्यां साठी 11 लाख अर्ज महाराष्ट्र शासनाकडे प्राप्त झाले याचा अर्थ महाराष्ट्रात बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आता स्पष्ट झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी राज्य शासनावर केली.

तपासे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या वेळी देशात आणि राज्यात युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे म्हटले होते तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार असल्याचे म्हटले होते मात्र वास्तव्य युवकांना शासकीय नोकरी आणि रोजगार देण्यात केंद्र भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आकडेवारीवरून समोर आले आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे वचन भाजपने नऊ वर्ष आधी दिले होते याचीही आठवण तपासे यांनी करून दिली.

मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात देशात सर्वाधिक बेरोजगारी झाली हे कोणी नाकारू शकत नाही.

महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प गमावले व त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीला राज्यातील लाखो तरुण मुकले हे महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही असा थेट आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

सुशिक्षित युवकांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती करून त्यांच्यासाठी रोजगार करिता पोषक वातावरण निर्माण करण्यात येईल या महायुतीच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी चांगला समाचार घेतला.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यात मोठ्या प्रमाणात आलेले उद्योग प्रकल्प राज्यातून बाहेर गेले आता राज्यातील युवकांना कोणत्या नोकऱ्या देणार असा प्रश्न तपासे यांनी उपस्थित केला.

सुशिक्षित युवकांनी समोसे तळत बसावे अशी भाजपची इच्छा आहे का ? असाही प्रश्न तपासे यांनी विचारला. 2024 च्या निवडणुकीपूर्वी रोजगार संदर्भात आता कुठला नवीन जुमला मार्केटमध्ये येतो हेच पाहणे आता बाकी आहे असा टोला महेश तपासे यांनी भाजप सरकारला लगावला आहे

तपासे पुढे म्हणाले देशातील भाजप शासित राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्याचे चित्र समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या हक्कासाठी सदैव लढत राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच युवकांना बेरोजगारीच्या समस्येतून दूर करण्यासाठी सरकारने उपायोजना कराव्यात अशी मागणी महेश तपासे यांनी राज्य शासनाकडे केली.सरकारने रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प राज्यात आणण्याकरिता प्रथम प्राधान्य द्यावे असेही ते पुढे म्हणाले.